चंद्रपुर :- चंद्रपूर रय्यतवारी कॉलरी भागात अचानक भूस्खलन झाल्याने एका कुटुंबावर संकट कोसळले आहे. दोन दिवस बाहेरगावी राहून घरी परतलेल्या शिवणकर कुटुंबाच्या घरात २० फूट खोल खड्डा पडल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत प्रशासनाला आवश्यक सूचना केल्या आहे.
यावेळी तहसीलदार विजय पवार, सहायक आयुक्त सचिन माकोडे, रामनगर ठाणेदार सुनिल गाडे, अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे चंद्रकात बातव आणि वेकोलिच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
घरातील महिला दरवाजा उघडताच अचानक खड्ड्यात पडली. स्थानिकांनी तात्काळ मदत करत शिडीच्या सहाय्याने तिला बाहेर काढले. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. परंतु, शिवणकर कुटुंबावर ही घटना अत्यंत भीषण असल्याने त्यांना तातडीने मदत पुरवण्यात आली.
गेले दहा दिवस चंद्रपूर शहर -जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी व कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भूभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या भागातील सुरक्षितता तपासण्यासाठी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी वेकोली प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सुचना आमदार जोरगेवार यांनी दिल्या.
शिवणकर कुटुंबाच्या राहण्याची सोय वेकोलि वसाहतीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मनपा प्रशासनाने तातडीने पिडीत कुटुंबाला मदत करावी आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशीही सूचना आमदारांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment