चंद्रपूर : एकीकडे देशात स्वातंत्र्याची ७५ वे सुवर्ण महोत्सव साजरे होत असताना जिवती तालुक्यातील शेतमजूर, शेतकरी, भूमिहीन, आदिवासी बांधव विविध समस्यांचा सामना करीत आहे. सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे येथील शेतकरी, शेतमजुरांवर अन्याय होत असून, येथील शेतकरी, शेतमजुरांच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी ७ डिसेंबरपासून जिवती तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. सुग्रीव गोतावळे यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन पट्ट्यांचा विषय मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कोणत्याही राजकीय नेत्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न केले नाही. दोन पिढ्या पूर्ण झाल्या. आता तिसरी पिढी आहे. मात्र, तिसऱ्या पिढीलाही तोच त्रास भोगावा लागत आहे. संपूर्ण जिवती तालुका वनआरक्षित असल्याने घरकुलाचा प्रश्न गंभीर आहे या समस्यांसह तीन पिढ्यांची अट रद्द करून अतिक्रमणधारकांना जमिनीचा पट्टा देण्यात यावा, सातबारा फेरफार करणे व वारसान नोंदी तत्काळ करण्यात यावे, यावलकर समितीच्या शिफारशीनुसार, ग्रा.पं.संगणक परिचालक यांना सुधारित आकृतीबंधानुसार किमान वेतन देण्यात यावे, जातीचे दाखले सर्वाना देण्यात यावे, गृहचौकशीनुसार, जातवैधताप्रमाणपत्र त्याच जिल्ह्यात देण्यात यावे, जिवतीत बसस्थानक तत्काळ मंजूर करण्यात यावे, जिवती नगरपंचायतमध्ये अग्नीशमन कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात यावी, जिवती नगरपंचायत येथील मंजूर असलेल्या ६६४ घरकुलांना बांधकामाची परवानगी वनविभागाकडून तत्काळ देण्यात यावी, ग्रामीण रुग्णालयाचत पदभरती करून रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे आदी मागण्यांकडे या बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येणार असल्याचे प्रा. सुग्रीव गोतावळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विजय गोतावळे, सुदाम राठोड, बालाजी भुते, लक्ष्मण मंगाम, विनोद पवार, मुकेश चव्हाण, शब्बीर जहागिरदार, दयानंद राठोड, प्रेम चव्हाण उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment